जळकोट: ओमकार सोनटक्के
जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी खाजगी आर ओ प्लांट आहेत. जळकोट तालुक्यातील ७० ते ८० टक्के नागरिक याच पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. सध्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जळकोट तालुक्यात आर ओ प्लांटमधून मिळणा-या पाण्याच्या जारचे दर वाढलेले नाहीत. सध्या म्हणावी तेवढी पाण्याची टंचाई जाणवत नसल्यामुळे तालुक्यात पाण्याच्या जारचे दर वाढलेले नाहीत .
जळकोट तालुक्यामध्ये जूनच्या सुरुवातीला मोठा पाऊस झाला होता यामध्येच तालुक्यातील अनेक साठवण तलावामध्ये तसेच पाझर तलावामध्ये पाणी साचलेले आहे. असे असले तरीही जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झालेली आहे . फेब्रुवारी मार्च मध्ये बंद पडणारे बोअर आता ऑक्टोबर महिन्यामध्येच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कुपनलिकेचे पाणी गेलेले आहे .
असे असले तरीही जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये वॉटर प्लांट मधून मिळणारे शुद्ध स्वरूपाचे पाणी पूर्वीच्याच दराने विकले जात आहेत. शासकीय वाटर प्लांट पेक्षा खाजगी वॉटर प्लांटची संख्या जास्त आहे . सध्या जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी साध्या पाण्याचे दर हे प्रति जार १० रुपये इतके आहेत तर थंड पाण्याचा जार हा २० रुपयाला मिळतो आहे. तर अनेक ग्रामपंचायतींनीदेखील वाटर प्लांट बसलेले आहेत. या प्लांटमधूनदेखील अगदी कमी दरामध्ये नागरिकांना शुद्ध पाणी दिले जाते.
















