जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये शुक्रवार शनिवार तसेच रविवार या तीन दिवस पडलेल्या पावसामुळे पिकांना याचा फायदा झाला असून पिके या पावसामुळे तरारली आहेत . सध्या शेतकरी हा पिकामध्ये अंतर्मशागतीचे कामे करण्यात व्यस्त आहे . जळकोट तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून दडी दिली होती यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत होते. हलक्या जमिनीवरील पिके पूर्णत: वाया गेली. चांगल्या जमिनीवरील पिकेही उन्हामध्ये माना टाकून देत होते. त्यामुळे पाऊस पडावा यासाठी शेतकरी हे देवाला साकडे घालत होते.
अखेर दीड महिन्यानंतर जळकोट तालुक्यात पाऊस बरसला आणि हा पाऊस जरी रिमझिम स्वरूपाचा असला तरी पिकांना मात्र फायद्याचा होता. जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या सोयाबीन तसेच तूर व कापूस पिकाला या पावसाचा फायदा झाला . कोमेजू लागलेली पिके पाऊस पडल्यानंतर हिरवी गार झाली आहेत . वा-यासंगे ही पिके डोलत असल्याचे दिसून येत आहे . जळकोट तालुक्यात पावसाने दीड महिन्यापासून उघडीत दिली होती यामुळे शेतक-यांनी अगोदरच ओळखणे तसेच खुरपणी ही कामे करून घेतली होती परंतु फवारणीसाठी पाऊस आवश्यक होता त्यामुळे पाऊस पडल्याने शेतकरी आता फवारणीमध्ये व्यस्त आहेत. कापूस तसेच सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी फवारणीकडे वळला आहे . यासोबतच ज्या शेतक-यांनी वखरणी तसेच खुरपणी करून घेतली नाही असे शेतकरी आता कामात व्यस्त आहेत. काही शेतकरी शेतकरी हे आपल्या पिकांना खताचा डोसही देत आहेत.