जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ जोमात झाली असून शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यातील बहुतांश भागातील सोयाबीन पीक सध्या फुलो-याच्या अवस्थेत आले आहे तर मुगाच्या पिकास शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय कापूस पिकाचीही वाढ चांगली होत असून झाडांवर भरघोस बहर दिसून येत आहे.
यंदा सुरुवातीस पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र जुलैच्या अखेरीपासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतशिवार हिरवाईने नटले असून सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस पिकांची वाढ समाधानकारक असल्याचे चित्र आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या सोयाबीनमध्ये फुलोरा आणि शेंगा भरण्याचा टप्पा महत्त्वाचा असल्याने या काळात पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतक-यांनी नियमितपणे पिकांची पाहणी करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक भागांत मुगाच्या पिकास शेंगा लागल्याने चांगल्या उत्पादनाची आशा निर्माण झाली आहे. कापूस पिकाचीही वाढ समाधानकारक असून योग्य वातावरण कायम राहिल्यास यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या शेतशिवारातील हिरवाई आणि जोमदार पिके पाहून जळकोट तालुक्यातील शेतक-यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, आगामी काळात हवामानाची साथ कायम राहिल्यास खरीप हंगाम भरघोस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















