तरुणाई, महिलांना काम देण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री पाटील यांची ग्वाही
औसा : प्रतिनिधी
देशातील तरुणाई व महिलांना सहकाराच्या माध्यमातून काम देण्याचा प्रयत्न सरकार करीत असून सेवा सोसायटी आता केवळ शेती पुरत्या मर्यादित न राहता विविध प्रकारचे ५१ व्यवसाय या माध्यमातून उभा करता येतात, यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी जे-जे चांगले करता येईल, ते करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किल्लारी येथील शाखेच्या इमारतीचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे उपस्थित होते. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्यासह प्रमुख अतिथी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील गणपतराव बाजुळगे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अभय साळुंके, प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, आबासाहेब पाटील, शेषेराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, विजेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. राज्यातील शेतकरी हा विमान व हेलिकॉप्टरला लागणारे इंधन लवकरच तयार करू शकेल, अशा पद्धतीचे काम सहकार चळवळीच्या माध्यमातून भविष्यात करावयाचे आहे. सहकार चळवळीत आता चांगले लोक आले पाहिजेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने लातूर जिल्ह्याला एक चांगली ओळख निर्माण करून दिली आहे. कारखानदारी, बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतक-यांचे हित डोळ््यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत. एका चांगल्या बँकेचा मी संचालक असून चांगल्या बँकेचा संचालक राज्याचा सहकार मंत्री झाला, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. याचे सर्व श्रेय राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आहे, असे ते म्हणाले.
मी मोठे होण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे. मी जेव्हा इतर जिल्ह्यात जातो, तेव्हा मी एका चांगल्या बँकेचा संचालक आहे असे अभिमानाने सांगत असतो. येणा-या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना अधिक मदत कशी करता येईल, यासाठी सरकार म्हणून मी संचालक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
प्रास्ताविक संचालक अशोक गोविंदपूरकर यांनी केले तर सभेचे सूत्रसंचालन पी. सी. पाटील यांनी केले आणि उपस्थितांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक पृथ्वीराज सिरसाठ, अशोक गोविंदपूरकर, बँकेचे संचालक दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, अनुप शेळके, राजकुमार पाटील, मारुती पांडे, सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. अनिता केंद्रे, श्रीमती भोसलेताई, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख, बँकेचे मीडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, बँकेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बँकेला राज्यात
अव्वलस्थानावर न्यायचेय
जिल्ह्यातील शेतक-यांना पुढे घेऊन जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागते. फक्त लातूर जिल्हाच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्हा बँकांसाठी लातूर जिल्हा बँक ही एक आदर्श ठरणार आहे. जिल्ह्याला पुढे घेऊन जायचे आहे. यासाठी चांगली दृष्टी व चांगला विचार ठेवून काम केले तर विकास घडतो, शेती संस्था जशा मजबूत होत आहेत, तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून पगारदार सहकारी संस्थाही सक्षम झाल्या आहेत. गेल्या ४० वर्षांच्या कार्यकाळात बँकेच्या संचालक मंडळाने नियमांमध्ये राहूनच परंतु माणुसकीचा विचार करून ताबडतोब सकारात्मक निर्णय घेतले आहेत. याचा फायदा शेतक-यांसोबतच लातूर जिल्ह्यातील व्यापा-यांना अप्रत्यक्षरीत्या होत असतो. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या साखर कारखानदारीमुळे जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपये लातूरच्या बाजारपेठेत वेगवेगळ््या क्षेत्रात फिरताना दिसत आहेत, हे केवळ जिल्हा बँकेतील चांगले लोक, चांगला विचार घेऊन चालणारे संचालक मंडळ यांच्यामुळेच हे होऊ शकले. येणा-या काळात ही संस्था टिकली पाहिजे, या संस्थेत चांगले लोक आले पाहिजेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लातूर जिल्हा बँकेला राज्यात अव्वल स्थानावर घेऊन जाण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
सहकारमंत्र्यांमुळे स्थानिक
भूमिपुत्रांना नोकरीची संधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या ४० वर्षांत जिल्ह्याच्या शेतक-यांच्या विकासाचे निर्णय घेतले असून गेल्या ४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक शिस्त लावली आहे. लातूर जिल्हा बँकेत सध्या १२२ शाखा आहेत व २९ ठिकाणी स्वत:च्या मालकीच्या जागेत स्वतंत्र शाखा इमारती आहेत, आज बँकेत ८ हजार कोटींची उलाढाल असून ९०० कर्मचारी आहेत. वाढता व्याप लक्षात घेता बँकेच्या आणखी शाखा वाढणे गरजेचे असून यासाठी सहकार मंत्र्यांनी शासनाकडे प्रयत्न करून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा वाढविण्यासाठी सहकार्य करावे. लातूर जिल्ह्यात शेतक-यांनी घेतलेले कर्ज परतफेड वेळेवर करण्याची सवय येथील सभासदांना आहे. नियमित कर्ज परतफेड करणा-या सभासदांना ५० हजार रुपये देण्याचे शासनाने मान्य केले असून ही मदत आणखी वाढवण्यात यावी, यासाठी सहकार मंत्र्यांनी शासन दरबारी आपला शब्द वापरावा, असे आवाहन लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांनी केले.
राजकीय मतभेद न ठेवता
सहकारातून समृद्धीचा प्रयत्न
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्ह्यातील सहकारातील दो हंसो का जोडा असून राजकारण हे येथे फक्त निवडणुकांपुरतेच मर्यादित ठेवले जाते. निवडणुकांनंतर कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता सहकारातून समृद्धी व सहकारातून स्वप्नपूर्ती व्हावी, यासाठी नेते मंडळींनी आजवर मार्गदर्शन केलेले आहे. शेतक-यांचा विकास हाच केंद्रबिंदू ठेवून काम केले जाईल, असा विश्वास धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.
















