लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध १४ पोलीस स्टेशनमध्ये ४३७ वाहने बेवारस स्थितीत आहेत. या वाहनांवर ज्या कोणाची मालकी असेल, त्यांनी १५ दिवसांत मालकविषयक कागदपत्रासंह संबंधित पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे आवाहन वारंवार कले जात असले तरी या वाहनांना कोणी वारसच समोर येत नसल्याने पोलिसांना या बेवारस वाहनांची डोकेदुखी आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध १४ पोलीस स्टेशन येथे असलेली ४३७ वाहने भारतीय नागरी सुरक्षा संहिता १०६ (१०२ सीआरपीसी), १२४ म.पो.का. प्रमाणे कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आली आहेत. यामध्ये लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ६०, विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे १५, लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ३८, गांधी चौक पोलीस स्टेशन येथे ५०, गातेगाव पोलीस स्टेशन येथे ३४, औसा पोलीस स्टेशन येथे १४, अहमदपूर पोलीस स्टेशन येथे ३३, वाढवणा बु. पोलीस स्टेशन येथे २४, कासार सिरसी पोलीस स्टेशन येथे २०, उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे ३१, चाकूर पोलीस स्टेशन येथे ३३, देवणी पोलीस स्टेशन येथे ४२, औराद शहाजानी पोलीस स्टेशन येथे ४० आणि किल्लारी पोलीस स्टेशन येथे ३ वाहनांचा समावेश आहे.
या सर्व वाहनांच्या रजिस्टर क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांकची माहिती संबंधित पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहे. विहीत मुदतीत कोणाचीही मालकी हक्क सिध्द न झाल्यास कोणाचीही तक्रार नाही, असे गृहीत धरुन मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४५८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.