तिस-या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.२ टक्क्यांवर!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिस-या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा दर ६.२ टक्के राहिला आहे. याआधीच्या तिमाहीत हाच दर ५.६ टक्के राहिला. जीडीपीचे ताजे आकडे शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले. तिस-या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ६.३ टक्के राहील, अशी अपेक्षा होती. पण तो किंचित कमी राहिला. संपूर्ण वर्षातील विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
तिस-या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.३ टक्के राहण्याचा अंदाज होता. पण तो त्यापेक्षा काहीसा कमी राहिला. पण तिमाहीच्या तुलनेत विचार केल्यास विकास दरात वाढ झाली आहे. कारण सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ५.४ टक्के राहिला होता. जुलै ते सप्टेंबरमध्ये तिमाहीत अर्थव्यवस्थेत मरगळ पाहायला मिळाली. गेल्या सात तिमाहींमधील निच्चांकी कामगिरी पाहायला मिळाली. पण आता अर्थव्यवस्थेवरील चिंतेचे मळभ दूर होताना दिसत आहे.
२०२५ च्या तिस-या तिमाहीत जीडीपी ४७.१७ लाख कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे तर आर्थिक वर्ष २०२४ च्या तिस-या तिमाहीत हाच आकडा ४४.४४ लाख कोटी रुपये होता. या दोघांची तुलना केल्यास वाढ ६.२ टक्क्यांची आहे. सप्टेंबरदरम्यानच्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे आल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे काढण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसला.
पाच महिन्यांपासून
शेअर बाजारात घसरण
शेअर बाजारात गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे देशातील लहान गुंतवणूकदार संकटात सापडले आहेत.