15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeनांदेडझाड कोसळून ३ जखमी, बालकाचा मृत्यू

झाड कोसळून ३ जखमी, बालकाचा मृत्यू

नांदेड : प्रतिनिधी
सध्या संततधार पाऊस सुरू असून रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास श्रीनगर भागात भले मोठे झाड रस्त्यात उन्मळून पडले. या झाड्यांच्या फांद्यांमध्ये स्कुटी सापडून महिलेसह तिघे जखमी झाले. यात एका लहान बालकाला गंभीर दुखापत होऊन उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या घटनेत स्कुटीचा चुराडा झाला असून अन्य नागरिक थोडक्यात बचावले.

मागील आठवड्या भरापासून शहरासह जिल्ह्याभरात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शहर परिसरातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. तर या पावसात रस्त्यालगत आणि विविध भागात असलेली अनेक जुनी झाडे मुळासकट उन्मळून पडत आहेत. काही दिवसांपुर्वी न्यायालय परिसरातील झाड उन्मळून पडले होते. यानंतर शहरातील अंत्यत वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर भागातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाजवळील रस्त्यालगत असलेले भले मोठे जुने झाड रविवारी अचानक मुळासकट उन्मळून पडले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एका बाजूने झुकत हे झाड मुख्य रस्त्यातच आडवे झाले. यात स्कुटीसह एक महिला आणि रस्त्यावरून जाणारा एक पुरूष व दहा वर्षाचा लहान बालक सापडला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले.

यात त्या स्कुटीचाही चुराडा झाला. तर अन्य नागरिक थोडक्यात बाचावले. ही घटना पाहताच रस्त्यावरून जाणा-या नागरिकांनी धावपळ करून झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने रूग्णालयात पाठवून दिले, असे काही प्रत्यक्षदर्र्शीनीं सांगीतले. ही माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला मिळताच अधिकारी केरोजी दासरे आपल्या जवानांसह दाखल झाले. अवघ्या काही वेळात कटरच्या मदतीने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून झाडाचा बुंदा बाजूला केला. तोपर्यत उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान जखमी झालेल्या लहान बालकाचे नाव यश गुप्ता रा. जवाहरलाल नगर नांदेड असे असून एका खागसी रूग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा दुपारी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR