न्यू यॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १००% टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिका आणि चीनच्या शेअर मार्केटपासून ते क्रिप्टोकरन्सी बाजारापर्यंत सर्वत्र हाहाकार माजला आहे.
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटने एका दिवसातच सुमारे ५६० अब्ज डॉलर (४६.८ लाख कोटी रुपये) गमावले. बिटकॉइन, एथेरियम, डॉजकॉइन यांसारख्या प्रमुख डिजिटल करन्सी कोसळल्या.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या निर्णयाचा परिणाम जगभरातील १६ लाखांहून अधिक क्रिप्टो गुंतवणूकदारांवर झाला. केवळ एका तासातच ७ अब्ज डॉलरच्या पोझिशन्स जबरदस्तीने संपवाव्या लागल्या. एकूण १९ अब्ज डॉलरचे लिक्विडेशन झाले. डिजिटल अॅसेट्सच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक विक्री मानली जात आहे.
प्रमुख कॉइन्समध्ये पडझड : ट्रेडर्स मोठ्या प्रमाणात आपली लीव्हरेज्ड पोझिशन्स संपवत असल्यामुळे क्रिप्टो ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये १४५% वाढ झाली आहे. कॉइन मार्केटकॅपच्या मते, क्रिप्टो मार्केट कॅप एका दिवसात $४.३० ट्रिलियन वरून $३.७४ ट्रिलियनवर घसरले आहे.
शेअर मार्केटलाही धक्का : क्रिप्टोबरोबरच अमेरिकन शेअर बाजारातही घसरणीची लाट आली. एनव्हिडीया, टेस्ला, अॅमेझॉन यांसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर जबरदस्त दबाव दिसला. शेअर मार्केटमधील अंदाजे नुकसान १.७५ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. म्हणजेच, क्रिप्टो आणि शेअर बाजार मिळून गुंतवणूकदारांचे एकूण नुकसान सुमारे २ ट्रिलियन डॉलर (रु. १७७ लाख कोटी रुपये) झाले.