परभणी : पाथरी शहरातील सार्वजनिक शौचालयात अनंता टोम्पे यांचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणी ३ आरोपींना परभणी, पाथरी पोलीसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात अन्य दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी रूपाली टोम्पे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी भारत वाव्हळे, राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या तिघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात सदर आरोपींनी संगनमत करून १४ ते १५ एप्रिलच्या दरम्यान अनंता याने उधारीचे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून जिवे मारल्याची माहिती देण्यात आली होती. आरोपींनी अनंता यास घरातून बोलावून बाहेर नेवून मारहाण करून मृतदेह शहरातील सार्वजनिक शौचालयात टाकला होता.
या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करून आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असा शब्द पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कुटुंबियांना दिला होता. पोलीस पथकास आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अधारे पथकाने पुणे येथील वाघोली परिसरातील एका पेट्रोलपंपावरून राहुल शिंदे आणि अशोक खंडागळे या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी चौकशी दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीतून अनंता याला मारहाण केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यासोबत अनिल बालासाहेब उफाडे हा सहभागी असल्याची माहिती दिली. या माहितीवरून सुसगाव येथून अनिल उफाडे यास ताब्यात घेतले आहे. याचबरोबर पाथरी पोलिसांनी संजय आश्रोबा शिंदे आणि कपिल दगडोबा गवारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एस. मुत्येपोड, सपोउपनि. मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, फारूखी, गणेश कौटकर, पाथरीचे महेश लांडगे, स्वामी, घाईवट, कापूरे, सांगळे, लटपटे, शितळे, मुजमुले, घुगे, सायबर पोलीस स्टेशनचे संतोष वावळ, बालाजी रेड्डी व गणेश कौटकर यांच्या पथकाने केली.