वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतातील हजारो लोक सध्या अमेरिकेत नोकरी करत आहेत. यातील बहुतेक लोक हे आयटी क्षेत्राशी निगडीत आहेत. ट्रम्प यांच्या इशा-यानंतर एच-१ बी व्हिसाद्वारे अमेरिकेत काम करणा-या हजारो भारतीयांच्या नोक-या जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो भारतीय तरुण अमेरिकेत नोकरीसाठी जातात. मात्र आता ट्रम्प यांच्या निर्णयामुळे हजारो भारतीयांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे.
भारतातील बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांमधील अनेक कंपन्या अमेरिकेवर अवलंबून आहेत. त्यामुळे आता अमेरिकन कंपन्यांनी भारतातील किंबहुना भारतीयांची भरती थांबवली तर त्याचा नकारात्मक परिणाम भारतातील आयटी क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक स्टार्टअप्सला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमेरिकन कंपन्या संकटात : अमेरिकेतील अनेक आयटी कंपन्या भारतीय कामगारांवर अवलंबून आहेत. या कंपन्यांच्या प्रगतीत लाखो भारतीयांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. मात्र आता ट्रम्प यांच्या दबावामुळे या कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. या कंपन्या भरती कमी करणार की, दुसरा काही निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर कंपन्यांनी ट्रम्प यांचे निर्देश पाळले तर हजारो भारतीयांना त्याचा फटका बसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन टेक कंपन्यांमध्ये भारतीयांना नोकरी देण्याच्या विरोधात आहेत. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘एआय’ परिषदेत ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांना भारत आणि चीनमधील लोकांना कामावर घेऊ नका, असे आवाहन केले आहे. या भूमिकेच्या परिणामांकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.