वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीबद्दलच्या चर्चा पुन्हा वेगाने सुरू झाल्या आहेत. ७९ वर्षांचे ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. त्यांच्या पूर्वी, डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडेन यांनी हे पद सोडलं तेव्हा ८२ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर ट्रम्प यांचाच नंबर लागतो. दरम्यान, ट्रम्प यांच्या हातावर अलीकडेच काही निशाण, निळसर जखमा (ब्रूज) आढळून आल्या आहेत. त्यामुळे जगभर चर्चांना उधाण आलं, मात्र ते पाहताच ट्रम्प यांनी स्वत: पुढे येऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स दिले आहेत. आपण एकदम फिट असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
त्यांच्या हातावर दिसणारे निळे डाग (जखम) हे कोणत्याही पडण्यामुळे किंवा आरोग्य समस्येमुळे नाहीत, तर दररोज घेत असलेल्या अॅस्पिरिन औषधामुळे हे झालं आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. एका जाहीर सभेत ट्रम्प झोपी गेल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र ट्रम्प यांनी आता ते देखील नाकारलं आहे.
सध्या ७९ वर्षांचे असलेले ट्रम्प हे अमेरिकेचे दुसरे सर्वात वयस्कर अध्यक्ष आहेत. माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे असं त्यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तसेच आपल्या तब्येतीबद्दल सतत होणा-या चर्चांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या हातांवर असलेले निळे डाग (जे कधीकधी मेकअपने झाकलेले दिसतात) तसेच त्यांचे सुजलेले घोटे याबद्दल अलिकडच्या आठवड्यात, मीडिया रिपोर्ट्समधून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. रक्त पातळ करण्यासाठी ते दररोज अॅस्पिरिन घेतात, त्यामुळे असे निशाण दिसतात, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.
जेव्हा माझ्या हाताला दुखापत होते तेव्हा त्यावर मेकअप किंवा पट्टी लावतो असंही रिपब्लिकन अध्यक्ष ट्रम्प म्हणाले. त्यांच्या हातांवरील निळ्या डागांबद्दल ते खुलेपणाने बोलले. हाय-फाइव्ह देत असताना त्यांचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांची अंगठी त्यांच्या हाताच्या मागच्या बाजूला लागली तेव्हा हे घडल्याचं त्यांनी सांगितलं.

