40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरडॉ. कल्याण काळे यांच्यामागे स्वाभिमानी बळ

डॉ. कल्याण काळे यांच्यामागे स्वाभिमानी बळ

जालना लोकसभा निवडणूक, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर आव्हान

जालना : प्रतिनिधी
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिबा जाहीर केला आहे. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोणासोबतही युती नाही. मात्र, जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मविआला पाठिंबा जाहीर केला. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्थानिक पातळीवर पाठिंब्याचा निर्णय घ्या, असे म्हटले होते. त्याचा विचार करून जालन्यात डॉ. काळे यांना पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसचे बळ वाढले असून, दानवे यांच्यासमोर आव्हान उभा ठाकले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे आणि भाजप महायुतीचे रावसाहेब दानवे यांच्यात लढत होत आहे. त्यात दानवे आतापर्यंत पाचवेळा निवडून आले असून, आता सहाव्यांदा ते आपले नशीब आजमावत आहेत. त्यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्याने त्यांना आव्हान उभे राहील, असे वाटत नव्हते. परंतु डॉ. कल्याण काळे यांनी दानवेसमोर मोठे बळ उभे केले आहे. त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने रावसाहेब दानवे यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, शेतकरी हितासाठीच आपण मविआला पाठिंबा देत असल्याचे स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे धोरण शेतकरीविरोधी आहे, असेही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ना महायुतीसोबत आहे, ना महाविकास आघाडीसोबत. राजू शेट्टी यांनी स्वतंत्र भूमिका घेत हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली. येत्या १३ तारखेला जालना जिल्ह्यातील पदाधिका-यांना, शेतक-यांनाही मतदान करायचे आहे, त्यांनी कुणाला मतदान करावे, आपण काही अटी-शर्ती ठेवल्या आणि त्या अटी-शर्ती ज्या उमेदवाराला मान्य असतील, त्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.

स्थानिक पातळीवर निर्णयास मुभा
आम्हाला राजू शेट्टींनी आम्हाला मुभा दिली आहे की, तुम्ही स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या, कुणाला पाठिंबा द्यायचा आणि काय करायचे, हे स्थानिक पातळीवर ठरवण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही कार्यकारी आणि पदाधिका-यांच्या बैठकीमध्ये शेतकरी हिताच्या काही मागण्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर ठेवल्या आणि ते त्यांनी मान्य केल्या. यामुळे स्वाभिमानी संघटना आता त्यांच्या पाठिशी असेल, असे सुरेश काळे यांनी म्हटले.

हमीभावाची दिली गॅरंटी
शेतक-यांना हमीभाव मिळाला पाहिजे, फक्त हमीभाव मिळूनही फायदा नाही, त्या हमीभावाची गँरंटीही मिळाली पाहिजे, तसा कायदा केंद्रात आला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी पिकविम्यासाठी मिळणा-या सानुग्रह अनुदानाची रक्कम दोन लाखांऐवजी पाच लाख झाली पाहिजे, अशीही एक मागणी आहे. आरक्षणाच्या मुद्याचाही विषय त्यांनी मान्य केला, यासह इतर मागण्या मान्य केल्याने पाठिंबा जाहीर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR