नाशिक : प्रतिनिधी
महिला डॉक्टराच्या आत्महत्येने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवार, ६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. मनीषा यांच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत खळबळजनक दावे केले आहेत. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबा संबंध असल्याचा संशय मनीषा यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून गेल्या दीड वर्षापासून मनीषा यांना प्रचंड मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागत होता, असा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.
सततच्या मानसिक त्रासामुळे मनीषा जेजुरकर मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्या होत्या आणि याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी लावून धरली आहे. सध्या गंगापूर पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांचे जबाब यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या गंगापूर रोड परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, डी. के. नगर येथे कुटुंबासह राहत होत्या. शुक्रवारी (६ मार्च २०२६) सकाळी सुमारे ११.३० वाजता त्यांनी घरातील खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि परिचितांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

