सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील नामवंत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अनेक बाबी समोर येत आहेत. आरोपी मनीषा माने हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता वळसंगकर यांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. तसेच आरोपी मनीषा मुसळे-मानेची वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या हॉस्पिटलची पूर्ण सूत्रं मुलगा डॉ. अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार या प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे-माने या बघत असल्याची माहिती समोर आली आहे.
हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे डॉ. अश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता. त्यामुळे २०२५ साली डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्रे स्वत:कडे घेतली. तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या. डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-माने हिचे अधिकार कमी केले होते.
याच कारणामुळे मनीषा मुसळे-माने हिने डॉ. वळसंगकर यांच्याशी वाद घातला. शिवाय इमेल लिहीत स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर शपथपत्र देखील तयार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.