बॉयलरच्या स्फोटात ४० कामगार होरपळले, ८ गंभीर
सोनिपत : वृत्तसंस्था
मुंबईतील डोंबिवली भागातील एका कंपनीतील स्फोटाची घटना ताजी असतानाच आता आणखी एका कंपनीतील बॉयलरच्या स्फोटात ४० कामगार होरपळले असून, यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सोनिपतच्या राय इंडस्ट्रीयल परिसरातील रबर बेल्ट बनविणा-या कारखान्यात हा स्फोट झाला.
अचानक झालेल्या अपघातानंतर कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांना काही समजण्यापूर्वीच अनेक जण जखमी झाले. या भीषण दुर्घटनेत ४० हून अधिक कर्मचारी जखमी झाले असून, ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि सोनिपतचे डीसी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. मुंबईतील डोंबिवली भागात कारखान्यात झालेल्या स्फोटात मोठी जीवित हानी झाली. त्यामुळे मुंबई हादरलेली असतानाच आता सोनिपत जिल्ह्यात कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याने कर्मचा-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, कारखान्यातील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राय इंडस्ट्रीयल परिसरातील संवरिया एक्स्पोर्टस या नावाने कारखाना क्रमांक ३२९ मध्ये रबर बेल्ट बनविण्याचे काम सुरू होते. आज अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात कारखान्यात काम करणा-या मजुरांसोबतच जवळच्या कारखान्यातील कर्मचारीही जखमी झाले. जवळपास ४० कर्मचारी होरपळल्याने कामगार भयग्रस्त झाले आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदतीला धावून आलेल्या लोकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ सोनिपत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमी झालेल्या आठ मजुरांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. इतर जखमींवर सोनिपत शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.