31.1 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरतरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोन सावकार अटकेत

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी दोन सावकार अटकेत

मुरुड : प्रतिनिधी
मुरुड येथील खाजगी सावकारांच्याजाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मुरुड येथे घडली असून पोलिसांनी दोन तरुण सावकाराविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.  मुरुड येथील बस स्थानकाजवळील एका खत विक्रेत्याच्या तरुण मुलगा गिरीश गणेश ओझा याने दि १२ मे रोजी विष प्राशन केले होते. सावकाराच्या जाचास कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याची  चर्चा गावामध्ये होती. शनिवारी दि १८ मे रोजी या मुलाचे लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
बुधवारी दि २२ मे रोजी मुलाचे वडील गणेश सत्यनारायण ओझा यांनी मुरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीत मुलाच्या वडीलांनी म्हटले आहे की, माझा मुलगा गिरीश ओझा वय २३ वर्ष हा अचानक घरात कोणाला न सांगता १ मे पासून निघून गेला होता. याबाबत आम्ही नातेवाईकाकडे  ठिकाणी त्याची चौकशी करत होतो. दि १० मे रोजी गावातील अभिजीत शहाजी नाडे हा तरुण माझ्याकडे आला व तुमच्या  मुलाने माझ्याकडून आठवड्याला तीन हजार रुपये या दराने तीस हजार रुपये व्याजाने घेतले असल्याचे सांगितले. मला मुद्दल ३० हजार रुपये व व्याज देण्याची मागणी केली. तसेच  तुमच्या मुलाने मला तीस हजाराच्या बदल्यात त्याची गाडी व गाडीच्या टीटी फॉर्मवर सह्या करून दिल्याचे सांगितले.
यानंतर दुस-या दिवशी गावातीलच वाघ्या उर्फ गणेश व्यंकट नाडे हा तरुण माझ्याकडे आला व तुमच्या मुलाने माझ्याकडे चालत असलेली भिशी उचलून घेतली असून त्यानंतर पुढील हप्ते भरलेले नाहीत असे सांगून  बीसीच्या पैशाची मागणी केली.  भिशीचे पैसे न दिल्यास तुमच्या मुलाला बघून घेतो अशी धमकी दिली. या मुलांच्या धमक्यांना कंटाळूनच माझा मुलगा घर सोडून गेला होता.  दि १२ मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास तो घरी आला व त्याने विष प्राशन केले. या मुलाला उपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले असता दि १८ मे रोजी तो मयत झाला.
मुलाला व्याजाच्या पैशासाठी वारंवार मानसिक त्रास दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केली असे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत ग्रुप पोलिसांनी आरोपी अभिजीत शहाजी नाडे व वाघ्या उर्फ गणेश व्यंकट नाडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आठवड्यात पाच ते दहा टक्के म्हणजेच महिन्याला २० ते ४० टक्के व्याजाने पैसे देणारे अनेक सावकार मुरुड मध्ये कार्यरत असून यापूर्वी या सावकारांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.  या सावकारी  करणा-यांमध्ये तरुण सावकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या सावकारांना व त्यांच्या अवैध सावकारीस वेळीच आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR