वाई : प्रतिनिधी
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाचे अध्यक्ष, थोर संस्कृत विद्वान, लेखक व प्रभावी वक्ते लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २०२५ हे शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील नवीन पिढीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या समग्र वाङ्मयाचा सखोल अभ्यास करावा व त्यावर लेखन करावे या हेतूने प्राज्ञपाठशाळामंडळ या संस्थेने एक निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली आहे व या स्पर्धेचा विषय ‘तर्कतीर्थांचे विचार विश्व’असा आहे अशी माहिती अनिल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही निबंध स्पर्धा महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यांनी वरील विषयावर आपला टंकलिखित निबंध संस्थेकडे ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी पाठवावा. निबंधाची शब्द मर्यादा २००० शब्दांपर्यंत आहे. निबंध प्रचार्य/कुलगुरू यांनी प्रमाणित केलेला असावा.
या स्पर्धेसाठी यशस्वी ठरणा-या स्पर्धकांना पहिले बक्षीस ५००० रुपये, द्वितीय ३००० तर तृतीय २००० रुपये देण्यात येणार आहे. संबंधितांनी आपला निबंध सचिव, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई ३०९/३१०, गंगापुरी, वाई -४१२ ८०३. मोबा. – ८१४९९ ९५९०४ या पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने पाठविण्याचे आवाहन अनिल जोशी यांनी केले आहे.