सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सध्या राज्याच्या राजकारणात तळकोकणातील महायुतीचे राजकीय गणित बदलताना पाहायला मिळत आहे. आमदार निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करून भावाविरोधातच रान उठवले आहे. भावांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे कणकवलीचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच निलेश राणे यांनी २६ नोव्हेंबर रोजी मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजपा पदाधिका-याच्या घरी धाड टाकत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत.
प्रसार माध्यमांसमोर आमदार निलेश राणे म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले होते. या ठिकाणच्या निवडणुकीतील वातावरण बिघडवण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली होती. २६ नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणचा पत्ता आम्हाला सापडला. त्यामुळे आम्ही तिथे गेलो. तेव्हा कळले की इथेच सर्व काही जमा होत आहे. पण अशा प्रकारे वाटण्यासाठी पैसे आणणे याची ही एकच बॅग नाही. जेव्हापासून रवींद्र चव्हाण येऊन गेले तेव्हापासून ५० लाख, १ कोटी आणण्याचे काम सुरू आहे.
रवींद्र चव्हाणांच्या जवळ असणा-या सात, आठ लोकांच्या घरात सुद्धा असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मी पोलिसांना सांगितले आहे की, त्यांनी गस्त वाढवावी आणि त्या-त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात यावा. आमचे लक्ष आहेच, असे निलेश राणेंनी सांगितले. निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे, हे आमचे म्हणणे आहे. नाहीतर ही निवडणूक गरीब माणूस कशी लढवणार? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.
नाकाने कांदे सोलण्याचे धंदे : रोहित पवार
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणा-या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आ. निलेशजी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावे.

