अभिनेता विजयच्या रॅलीत अनेक जण गुदमरले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
चेन्नई : तामिळनाडूतील करूरमध्ये राजकारणी आणि अभिनेता विजय यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली. करुर सरकारी रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले असून, या चेंगराचेंगरीबद्दल दु:ख व्यक्त केले.
टीव्हीके प्रमुख विजयने शनिवारी प्रचारासाठी करूरला भेट दिली. त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते. करूर द्रमुकचा गड मानला जातो. त्यामुळे विजयच्या प्रचारासाठी बरीच गर्दी जमली होती. मात्र, याच गर्दीचे रुपांतर दुर्घटनेत झाले. विजयच्या भाषणानंतर काही वेळातच गर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. रिपोर्टनुसार उष्णता, पाण्याचा अभाव आणि गर्दीमुळे अनेक महिला, पुरुष आणि मुले बेशुद्ध झाली. बेशुद्ध झालेल्या लोकांना तातडीने करूर सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, गर्दीत अनेक लोक बेशुद्ध पडल्याने विजय यांना त्यांचे भाषण तात्पुरते थांबवावे लागले. गर्दीमुळे अनेक पक्ष कार्यकर्ते आणि मुले कोसळून बेशुद्ध पडली. यावेळी विजय यांनी व्यासपीठावरून गर्दीला शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, बेशुद्ध पडलेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परिस्थिती लक्षात येताच द्रमुक नेते तथा मंत्री सेंथिल बालाजी आणि करुर जिल्हा जिल्हाधिकारी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली. जखमींवर उपचारही सुरू करण्यात आले. रॅलीच्या गर्दीत अडकल्याने अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. त्यावेळी विजय यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आणि भाषण सोडून ते निघून गेले.
मुख्यमंत्र्यांसह विरोधी
पक्षनेत्यांकडून शोक
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी घटनेबद्दल दुख: व्यक्त केले. त्यांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिका-यांना तातडीने परिस्थिती पूर्ववत करण्याचे आदेश दिले. तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनीही दु:ख व्यक्त केले.
लाठीचार्जनंतर
चेंगराचेंगरी
अभिनेता विजयच्या रॅलीत जमलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्जमुळे चेंगराचेंगरी झाली. ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.