अमरावती : वृत्तसंस्था
देशभरात विविध स्तरातून मंदिरे आणि प्रसादांचे पावित्र्य संरक्षित करण्याची मागणी होत असताना तिरुमला तिरुपति देवस्थानमधील लाडू भेसळ प्रकरणाच्या चौकशीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एसआयटीची घोषणा केली. पोलीस महानिरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिका-यांचा त्यात समावेश असेल, असे नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लाडू प्रकरणी खोटे पसरविल्याबद्दल नायडू यांना समज देण्याची मागणी केली. श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे काळजीवाहक तिरुमला तिरूपती देवस्थान (टीटीडी) येथे तूप स्वीकारण्याच्या प्रक्रियेचे विवरण या आठ पानी पत्रात रेड्डी यांनी दिले.
तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल : नायडू यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाडू आणि तुपाचे नमुने तपासणीसाठी पाठविले. सर्व पातळ्यांवरुन अहवाल आल्यानंतरच मी जाहीर केले, असे चंद्राबाबू नायडू म्हणाले. हा वाद मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी सुरू झाला होता. गेल्या सरकारने तूप खरेदी प्रक्रियेत बरेच बदल केल्याचेही नायडू म्हणाले.
तुपावर जीपीएसची नजर : तिरुपति मंदिरात आता लाडू बनविण्यासाठी कर्नाटक दूध महासंघाच्या ‘नंदिनी’ या तुपाचा वापर केला जात आहे. ३५० टन तुपाचा पुरवठा करणा-या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली आहे.