नवी दिल्ली : वृत्तसंस्था
तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणा-या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्याची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप केले आहेत. तर जगनमोहन यांच्या ‘वायएसआर’ काँग्रेस पक्षानं हे सर्व आरोप फेटाळले. तेलुगु देसमपाठोपाठ आता भाजपनेही जगनमोहन यांना या प्रकरणात लक्ष्य केलं आहे. भाजप नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवधर यांनी या प्रकरणात जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
तीन टेकड्या ख्रिश्चनांना : तिरुमला देवस्थानाकडून आलेली बातमी धक्कादायक असून हा हिंदूविरोधातील मोठा कट आहे. जगनमोहन रेड्डींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देवधर यांनी केली. त्याचबरोबर जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन आहेत. तिरूमला देवस्थानला ७ हिल्स म्हटले जाते. त्यामधील ३ टेकड्या त्यांनी ख्रिश्चनांसाठी दिल्या, असा गंभीर आरोप देवधर यांनी केला.
जगनमोहन रेड्डी यांनी श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला प्रसाद कंत्राट दिले होते. तिरुपती-तिरुमलामध्ये धर्मांतर करण्याचा त्यांचा कट होता. तिरुमला बसेसमध्ये जेरुसलेम यात्रेची जाहिरात केली होती. तेलुगु शाळा ख्रिश्चन मिशिनरीला देण्याचा त्यांचा कट होता, तो हाणून पाडला, असा दावा देवधर यांनी केला आहे.