दोन कुटुंबात चाकू, कोयत्याने वार, ३ ठार
मुंबई : प्रतिनिधी
मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटीलनगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचे गंभीर गुन्ह्यात रुपांतर झाले. या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
हमीद शेख (४९), रमणलाल गुप्ता (५०) आणि अरविंद गुप्ता (२३) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असून हे सर्व गणपत पाटील नगर मधील रहिवाशी आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आज दोन्ही बाजूने तुफान राडा झाला होता. याच राड्यामध्ये गणपत पाटील नगर परिसरात असलेला दुकानदारांकडून चाकू आणि कोयता घेऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये तीन जणांचा जीव गेला असून ४ जण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी, सध्या एम.एच.बी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.