25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रतुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात

तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात

अकलूज येथे रंगला पहिला गोल रिंगण सोहळा
अकलूज : संजय बडे
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दि. १२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ३ जेसीबीच्या साह्याने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी २१ तोफांची सलामी देत पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले तर सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचा रिंगण सोहळा पार पडला.

दि. ११ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम आटोपून दि. १२ जुलै रोजी नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी ८ वाजता नदी पुलावर पालखी सोहळ्याने प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह तालुक्यातील प्रमुख अधिका-यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. स्वागतानंतर तुकोबारायांच्या पालखी रथाचे सारथ्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

सकाळी ९.३५ वाजता पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीत गांधी चौकात आगमन झाले. या वेळी अकलूजकरांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलूज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वागत केले. यानंतर सदूभाऊ चौकात १०.३० वाजता पालखीचे आगमन झाले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पालखीने १०.४५ वाजता प्रवेश केला. पालखीची मानाची आरती व पाद्यपूजा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व ऋतुजादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली. ११.१० वाजता रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला.

सुरुवातीस पताकाधारी, तुळशी व हंडाधारक महिला, विणेकरी, टाळकरी यांनी धावत एक फेरी पूर्ण केली. अश्वांची पूजा खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली. यानंतर कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पताकाधारीस्वार अश्व व बाभुळगावकरांचा देवाचा अश्व यांनी रिंगण सोहळ्यात धावत प्रत्येकी ५ फे-या पूर्ण केल्या तसा वैष्णवांनी तुकोबारायांच्या नावाचा एकच जयघोष केला. या जयघोषाने आसमंत दुमदुमला.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे, स्वरूपाराणी मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, कृष्णप्रिया मोहिते पाटील, अभिजित रणवरे, हर्षवर्धन खराडे पाटील यांच्यासह प्रशासनातील विविध मान्यवर प्रमुख उपस्थित होते. रिंगण सोहळ्यानंतर वैष्णवांनी मैदानावर पारंपारिक खेळ सादर केले. पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर दर्शनासाठी व मुक्कामासाठी विसावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR