26.8 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्र‘तू सुंदर दिसतेस..’ असा मेसेज करणे ठरतो विनयभंग; थेट शिक्षा

‘तू सुंदर दिसतेस..’ असा मेसेज करणे ठरतो विनयभंग; थेट शिक्षा

दिंडोशी : वृत्तसंस्था
आता मेसेज करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस, किंवा तू सुंदर दिसतेस असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतंच महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये एका घटनेप्रकरणी कोर्टाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, असा निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिला आहे.

कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करायचा. रात्री ११ ते १२.३० दरम्यान तो विविध फोटो आणि मेसेज करत असायचा. ‘‘तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहे. मी ४० वर्षांचा आहे, तुझे लग्न झालं आहे का?’’ असे मेसेज तो व्यक्ती सतत त्या महिलेला करायचा. ‘अनेकदा त्याने मला तू आवडतेस’, असेही मेसेज केले. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी कोर्टाने २०२२ रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. आज दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली.

यावेळी दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले. ‘कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे. हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषत: जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखत नाहीत. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे’, अशा शब्दात याप्रकरणी कोर्टाने फटकारले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR