26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसंपादकीय...तोबा पाऊस !

…तोबा पाऊस !

राज्याच्या अनेक भागांत रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोसमातील पहिली अतिवृष्टी झाली. हिंगोली, बीड, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यांत रविवारपासून जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले असून सखल भागात पाणी भरले. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. गणेशोत्सव काळात देशात व राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस म्हणजे १०९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला. त्या पेक्षाही अधिक पाऊस सप्टेंबर महिन्यात होईल, असा अंदाज आहे. राज्यातील सर्वच भागात पाऊस होईल. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत ४ सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.

विजांचा कडकडाट होणार असल्याने शेतक-यांनी सावध रहावे, शेतात झाडाखाली थांबू नये किंवा आपली जनावरेही बांधू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हवामानाचा अंदाज वर्तवताना त्यांनी म्हटले आहे की, पुढील चार दिवसांत यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, सोलापूर, धुळे, नंदूरबार, नाशिक या भागात मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येईल. नाशिकमध्ये अतिवृष्टी होईल त्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येईल. त्यातून पाणी सोडल्यानंतर नांदेडपर्यंतचे बंधारे पाण्याने भरणार असून त्याचा फायदा शेतक-यांना होणार आहे. धाराशिवमध्येही पूरस्थिती उद्भवू शकते. सिद्धेश्वर, दुधना, येलदरी धरणे भरल्यामुळे नद्यांना पूर येतील. त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा रोहिलागड या दुष्काळी भागाला होणार असून पाऊस न पडणा-या या भागातील तळी भरून जातील. मराठवाडा, विदर्भाला पावसाने जोरदार दणका दिला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर नसला तरी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत शनिवारी मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला.

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. नांदेड जिल्ह्यात २६ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात २५ घरांची पडझड झाली तर १२ जनावरे दगावली. हिंगोलीत सखल भागाला तलावाचे स्वरूप आले, नदी-नाल्यांना पूर आला. परभणीत मासोळी, मुदगल धरणे तुडुंब भरली. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूर जिल्ह्यात एक तरुण शेतकरी वाहून गेला. जोरदार पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर आले, शेत-शिवारात पाणीच पाणी झाले. खरीप पिके पाण्यात बुडाली त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. सध्या सोयाबीन बहरात आहे. छातीपर्यंत आलेली ही पिके शेंगांनी लगडली आहेत; परंतु आभाळ कोसळत असल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावला जातो की काय, अशी बळीराजाची अवस्था बनली आहे. लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. रविवारी दिवसभर आणि रात्रीही पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जळकोट तालुक्यातील ढोर सांगवी येथील तरुण शेतकरी नदीत बैल धूत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पुराचे संकट असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक १३६.८० मि. मी. पाऊस झाला. जिंतूर तालुक्यात अकोली नदीला पूर आला. या पुरात सुमारे १०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजानुसार एकूण सरासरी पाऊस होतो आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमधील अपेक्षित पावसाची सरासरी झाली आहे. आता सप्टेंबर हा मान्सून पावसाचा एक महिना आहे. देशाच्या पाऊसमानाचा आढावा ३६ हवामान विभागाद्वारे घेतला जातो तसेच जिल्हा आणि प्रदेशनिहाय आढावादेखील घेतला जातो. त्यानुसार १३ हवामान विभागात अतिरिक्त पाऊस झाला आहे. १४ विभागात पावसाने सरासरी गाठली आहे आणि ९ विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे ४ हवामान विभाग आहेत. मराठवाडा वगळता इतर तिन्ही विभागांनी पावसाची सरासरी गाठली आहे. हवामान विभागाने आज महाराष्ट्रासह २० राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

देशात तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा ५६ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस झाला आहे. आकडेवारीनुसार यंदा देशात सरासरी उत्तम पाऊस होत असला तरी अनेक ठिकाणी अचानक वेळी-अवेळी झालेल्या जोरदार पावसाने महापुराच्या घटना घडल्या आहेत. हजारो-लाखो एकर शेतीमध्ये पाणी उभे राहिल्याने पिके कुजण्याची वेळ आली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत सर्व नद्यांना महापूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचे सुमारे १२२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जूनमध्ये प्रारंभी ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या.

आता सप्टेंबर महिन्यात अतिरिक्त पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या उशिरा होणार असे दिसते. अलीकडे खरीप आणि रब्बी हंगामात वेळी-अवेळी होणा-या पावसाचा शेतीला हमखास फटका बसतो आहे शिवाय ठराविक परिघातच जोरदार पावसाने महापूर येणे, भूस्खलन होणे, शहरात पाणी तुंबून राहण्याचे प्रकार वाढले आहेत. हवामान बदलामुळे असे प्रकार वाढत आहेत, असे म्हणून गप्प बसून चालणार नाही. येणा-या संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहिले पाहिजे. माणसाचे मन चंचल आहे. करुणा भाकायला अन् त्रागा करायला ते तयार असते. ये रे ये रे पावसा अशी करुणा भाकणा-या मनावर नको नको रे पावसा, अशी म्हणायची वेळ आली आहे कारण …तोबा पाऊस!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR