चारठाणा : येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील रिक्त असलेल्या शिक्षक पदांबाबत पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख यांनी नुकतीच जिंतूर गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिंतूर गटशिक्षणाधिकारी यांनी कोक येथील शिक्षीका लवकरच रूजू होण्याचे आश्वासन दिले असून भोगाव येथील शिक्षकांनी तात्काळ चारठाणा येथे रूजू व्हावे अन्यथा त्यांचा पगार काढण्यात येऊ नये असे आदेश भोगावच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे रिक्त पदांवर शिक्षक लवकरच रुजू होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न मार्गी लागणार असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये समाधनाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात सविस्त माहिती अशी की, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या १५ मे २०२६च्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांनी शाळेवर रुजू होणे अपेक्षित असतानाही ते अद्याप रुजू झालेले नाहीत. जिंतूर येथील उर्दू शाळेवर एक शिक्षकाचे पद रिक्त असल्याने त्या ठिकाणी चारठाणा येथे बदली करण्यात आलेल्या कोक येथील शिक्षिका आरजु बेगम यांना गटशिक्षणाधिकारी यांनी आदेशित करून एका दिवसात जिंतूर शाळेवर रुजू होण्यास भाग पाडले.
ही बाब पंचायत समिती सदस्य देशमुख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गटशिक्षणाधिकारी यांची दि.१६ सप्टेंबर रोजी भेट घेऊन संबंधित शिक्षक अद्याप चारठाणा शाळेवर रुजू का झाले नाहीत याबाबत विचारणा केली. तसेच भोगावच्या शिक्षकांचा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यानंतर गटशिक्षणाधिका-यांनी भोगाव येथील शेख सईद व दुरदाना बेगम या दोन शिक्षकांनी तात्काळ शाळेवर रुजू न झाल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करुन संबंधित शिक्षकांचा पगार काढण्यात येऊ नये असे आदेशित करत पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी भोगाव मुख्याध्यापक यांच्या नावे पत्र निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती प. सं. सदस्य देशमुख यांनी दिली आहे.
यावेळी तहेसीन देशमुख यांच्यासमवेत चारठाणा येथील पालक ताहेर पठाण, शेख गफ्फार, सय्यद अरशद, तय्यबखा पठाण, सय्यद खय्युम, नाजेरखा पठाण, सय्यद जिलानी उपस्थित होते. या कार्यवाहीमुळे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतील रिक्त पदांवरील दोन्ही शिक्षक लवकरच रुजू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पंचायत समिती सदस्य देशमुख यांचे पालक व नागरिकांकडून कौतूक करण्यात येत आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे पं. स. सदस्य तहेसीन देशमुख यांनी दै. एकमत शी बोलताना सांगितले.
















