सुरिन : वृत्तसंस्था
एकिकडे म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा भडका उडालेला असतानाच शेजारच्या थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर युद्धाला सुरुवात झाली आहे. रॉयल थाई आर्मीने वादग्रस्त सीमेच्या ईशान्येकडील भागाजवळील लष्करी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. त्याला प्रत्यूत्तर म्हणून कंबोडियाने एअर डिफेन्स सिस्टीम सुरु केली आहे. यात दोन विमाने पाडली गेल्याचे सांगितले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर आशियात सुरु झालेले हे दुसरे युद्ध आहे. थायलंडने गुरुवारी कंबोडियाच्या सीमेवर एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. मिसाईल हल्ले आणि हवाई हल्ले केले जात आहेत.
गुरुवारी सकाळपर्यंत थायलंडच्या सीमेवर सहा ठिकाणी कंबोडियाशी चकमक झाली आहे. सहा एफ-१६ विमानांपैकी एकाने कंबोडियात घुसून हल्ला चढविला आहे. यात एक लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचे थाई सैन्याने म्हटले आहे. तसेच हल्ले करून आपली सर्व विमाने परत बेसवर पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. कंबोडियन सैनिकांनी सुरिनमधील थाई लष्करी तळावर गोळीबार केला आणि सिसाकेटच्या दिशेने अनेक रॉकेट हल्ले केल्याचा दावाही थायलंडच्या सैन्याने केला आहे.
शिवमंदिर ठरले युद्धाचे कारण…
थायलंड-कंबोडियातील युद्धाला ११०० वर्षापूर्वीचं एक शिव मंदिर कारणीभूत ठरलं आहे. या शिव मंदिराला प्रेह विहेयर म्हटले जाते. या मंदिराला ९ व्या शतकात खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी बांधलं होतं. मंदिर आपल्या सीमेत असल्याचा कंबोडियाचा दावा आहे. तर मंदिराचा काही भाग सुरिन प्रांतात असल्याचा दावा थायलंडने केला आहे. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय कोर्टाने कंबोडियाला मंदिराचा अधिकार दिला होता. पण थायलंडने हा निर्णय पूर्णपणे मान्य केला नाही. तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या जागेवर थायलंडने दावा केला आहे. २००८ मध्ये युनेस्कोने या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सामील केलं, तेव्हापासून दोन्ही देशात तणाव वाढत आहे. २००८ ते २०११ या काळात मंदिराच्या आजूबाजूच्या भूखंडावरून दोन्ही देशात सशस्त्र संघर्ष झाला होता.