मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवले जाणार? राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलनीकरण होणार का? याबाबत चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज स्व. अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी केली. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली असेल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे झिरवाळ म्हणाले.
अजित पवार यांच्या उंचीचा कोणीही नेता आजच्या घडीला त्यांच्या पक्षात नाही त्यामुळे दोन गटांचे विलनीकरण करून परत शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी जोर धरत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती. आता ही मागणी आणखी जोरकसपणे होईल. या पुढे विखुरलेले राहून चालणार नाही. एकत्रच राहावे लागणार आहे असा एकूण सूर आहे; परंतु काही नेत्यांची मात्र विलनीकरणाला फारशी अनुकूलता नाही शिवाय शरद पवार आपली आजवरची भूमिका सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील का? हाही प्रश्न आहे. यामुळे आहे ती स्थिती कायम ठेवण्याचा त्यांचा आग्रह राहील.
या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी थेट भूमिका मांडली आहे. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. सुनेत्रा वहिनींच्या मंत्रिमंडळ सहभागासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. सुनेत्राताई पवार यांच्याकडे राज्यातील जबाबदारी सोपवली गेली तर त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. विधानसभेच्या पोटनिवडणुकीद्वारे त्या विधिमंडळात येऊ शकतील व त्यांच्या जागेवर पार्थ अथवा जय पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

