सोलापूर – डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालानुसार सनातनचे साधक निर्दोषच होते, हेच सिद्ध झाले आहे. सी.बी.आय. विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. विरेंद्रसिंह तावडे यांना निर्दोष मुक्त केले, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे ॲड. संजीव पुनाळेकर यांनाही निर्दोष मुक्त केले आणि हे करतांना या गुन्ह्यात लावलेला दहशतवादी कारवायांशी संबंधित वअढअ कायदाही रद्द ठरवला आहे. असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.
या प्रकरणात दोषी ठरवलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष जरी सनातन संस्थेशी संबंध नसला, तसेच ते सनातन संस्थेचे पदाधिकारी नसले, तरी त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले, अशी आम्हाला शक्यता वाटते. त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांनी जशी इतरांना निर्दोष मुक्त करण्यात भूमिका बजावली, तशीच उच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दोष मुक्त करण्यासाठी लढतील, असे त्यांनी आज घोषीत केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे निर्दोष मुक्त होतील, अशी आम्हाला खात्री वाटते.असेही राजहंस म्हणाले.या प्रकरणी आरोपपत्रात वेगवेगळ्या आणि सतत बदलणार्या भूमिका तपास यंत्रणांनी मांडल्या.
इतकेच नव्हे, तर आरोपी शोधण्यासाठी प्लांचेट च्या माध्यमातून सनातन संस्थाच दोषी असल्याचे वदवून घेण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना अगोदर मारेकरी ठरवण्यात आले. त्यापूर्वी ज्यांच्याकडून पिस्तुल मिळाले, त्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनाही क्लिन चिट देण्यात आली. त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केल्याची भूमिका मांडण्यात आली.
गेल्या ११ वर्षांत सनातनच्या १६०० साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. सनातनच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या.सीबीआयने आरोपपत्रात सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांची चौकशी करून त्यात कोणीही दोषी आढळले नाही, असे नमूद केले आहे. आज ११ वर्षांनंतर सनातन संस्थेला विलंबाने मिळालेला हा न्याय आहे.असे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणाले.