जळकोट : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती घोणसी तर्फे येथे आयोजित कुस्ती स्पर्धा हरियाणा, दिल्ली, पंजाब व महाराष्ट्राच्या मल्लांनी चांगलीच गाजविली. यामध्ये अंतिम कुस्ती ही लातूरचा पैलवान तसेच दिल्लीच्या पैलवानामध्ये झाली या झालेल्या चुरशीच्या कुस्तीमध्ये लातूरच्या पैलवानाने दिल्लीच्या पैलवानाला चितपट केले. यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला .
या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेत अगदी चार वर्षांच्या मुलांपासून ते ५० वर्षाच्या वयोवृद्ध मल्लांनी सहभाग नोंदवून कुस्त्यांचा फड गाजविला. १०० रुपयपासून ते २१ हजार रुपयापर्यंतच्या कुस्त्या झाल्या. यंदा घोणसीच्या कुस्ती स्पर्धेमध्ये अत्यंत चित्तथरारक कुस्त्यांचा खेळा झाला.
शेवटची कुस्ती दिल्लीचा अमित येरावत विरुद्ध लातूरचा भैरवनाथ जोगी यांच्यात झाली. ही कुस्ती अत्यंत अटीतटीची व रोमहर्षक झाली. या लढतीत लातूरचा मल्ल भैरवनाथ जोगी याने अमित येरावत यास चितपट करीत बाजी मारुन २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले. दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत या कुस्त्या चालल्या. या कुस्त्या यशस्वी पार पाडाव्यात यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.