नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ७ टक्के मते जास्त मिळविली आहेत. ही मतेच भाजपासाठी गेमचेंजर ठरली आहेत. या निवडणुकीत भाजपाला ४५ टक्के मते मिळताना दिसत आहेत.
२०२० मध्ये भाजपाला ३८.७ टक्के मते मिळाली होती. ‘आप’ला २०२० मध्ये ५५ टक्के मते मिळाली होती. ही ‘आप’ची मते अनेक कारणांमुळे भाजपा आणि काँग्रेस व इतरांकडे वळल्याचे दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत आपला ४३.६९ टक्के मिळताना दिसत आहेत. म्हणजेच ‘आप’ची मते जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाली आहेत.
‘आप’ची ७ टक्के मते भाजपाकडे वळली असली तरी उर्वरित मते ही काँग्रेसलाच मिळालेली नाहीत. इतर उमेदवारांनाही मिळाली आहेत. काँग्रेसला २०२० मध्ये ४.३ टक्के मते मिळाली होती. यंदा ६.४० टक्के मते मिळाली आहेत. इतरांना २०२० मध्ये २ टक्के मते होती, ती आता ४.२ टक्के झाली आहेत. दिल्लीत दोन्ही वेळेला ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.
हे विधानसभेचे असले तरी लोकसभेच्या सात जागांवर वेगळाच मतांचा पॅटर्न दिसला होता. लोकसभा निवडणुकीत या दिल्लीत ५४.७ टक्के मतदान झाले होते. काँग्रेस तीन जागांवर लढत होती. या मतांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १९ टक्के मते तर पाच जागा लढणा-या ‘आप’च्या वाट्याला २४.३ टक्के मते आली होती.