मुंबई : प्रतिनिधी
दिल्लीत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या नागरिकांबद्दल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दु:ख व्यक्त केले असून, अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीने मरावे लागणार आहे, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवी दिल्ली स्टेशनवर शनिवारी रात्री प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणा-या नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. योग्य नियोजन नसल्याने स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याने १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिका-यांनी देखील याची पुष्टी केली आहे.
दरम्यान, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही. तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी. हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबाबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत असलेली गैरव्यवस्था आहे. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री काय उत्तर देणार आहेत, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास, प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वरील प्रवासी प्रयागराजला जाणा-या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. अचानक वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने ही चेंगराचेंगरी झाली असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी देखील कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला होता.