पुणे : प्रतिनिधी
गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत आलेले पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मृत महिला तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांची अनामत रक्कम भरावी, अशी अट घातली होती. पैसे मिळाल्याशिवाय उपचार केले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यात आल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मात्र, आवश्यक ती वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, ही घटना अत्यंत दु:खदायक आहे. या प्रकरणामुळे या रुग्णालयाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल २७ कोटी रुपयांचा मिळकतकर थकविल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून हे चालवले जाते. रुग्णालय प्रशासनाने गेल्या सहा वर्षांपासून महापालिकेला एकही रुपयाचा कर भरलेला नाही. २०१९-२० पासून रुग्णालय मिळकतकर भरण्याचे टाळत आहे. त्यामुळे महापालिकेची तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांची थकबाकी राहिली आहे.
एकीकडे रुग्णालय प्रशासन आर्थिक अडचणींचा दाखला देत गरजू रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे स्वत:ची आर्थिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. जरी धर्मादाय संस्थांना मिळकतकरात सवलतीचा दावा केला जात असला, तरी महापालिकेच्या नोंदींनुसार रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेंतर्गत एका रुग्णाने उपचाराची मागणी केली असता, त्यालाही रुग्णालय प्रशासनाने थेट कागदावर ‘‘महात्मा फुले योजनेचा लाभ येथे मिळणार नाही’’ असे लेखी दिल्याचे प्रकरणही समोर आले आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेचा उद्देश राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवर मोफत आणि कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणे आहे. परंतु एवढ्या नामांकित रुग्णालयात ही योजना लागू होत नसल्याने, गरजू रुग्णांवर परिणाम होतोय, ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे.