छत्रपती संभाजीनगर : छावणीत दर गुरुवारी भरणा-या जनावरांच्या बाजारात दुभत्या म्हशीला मोठी मागणी वाढली आहे. त्याचे कारणही तसेच आहे उन्हाळ्यात दुधाचे प्रमाण कमी होते, अशावेळी दुभत्या म्हशी खरेदी करून दुधाचा तुटवडा काही प्रमाणात कमी केला जातो. यामुळे सध्या म्हशीचे भाव सव्वा ते दीड लाखाच्या वर जाऊन पोहोचले आहेत.
म्हशीच्या विक्रीसाठी प्रसिद्ध छावणीतील आठवडीबाजार हा खास म्हशीच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातून लोक येथे म्हशी खरेदीसाठी येत असतात. दर आठवडी बाजारात २५ पेक्षा अधिक म्हशी विकल्या जातात.
उन्हाळ्यात म्हशी दूध कमी देतात. यामुळे मागणी तेवढीच पण दुधाचा तुटवडा जाणवत आहे. मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी जनावरांचे मालक नवीन म्हशी खरेदी करतात. मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत. धुळे, गुजरातहून येणा-या म्हशीला सव्वा ते दीड लाखाचा भाव मिळत आहे. तर स्थानिक म्हशीला ८० हजार ते ८५ हजारांचा भाव मिळत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
गुजरातमधील जाफराबाद येथील म्हशीला छावणी बाजारात जास्त भाव मिळत असतो. त्यात दुभत्या म्हशी दिवसभरात १६ ते २० लिटरपर्यंत दूध देत असल्याने या म्हशी जास्त किंमत देऊन खरेदी केल्या जातात.‘जाफराबादी म्हशी’ नावानेच विकल्या जातात. एका म्हशीचे वजन ८०० किलो ते १ टनापर्यंत असते.