लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील नागरिकांना महानगरपालिकेमार्फत पुरवठा होत असलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. ११ एप्रिल रोजी मनपाचे आयुक्त देवीदास जाधव यांची भेट घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन दिले. तसेच मनपाचे स्वच्छ पाण्याचा पुरवठा नाही केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांतून दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पिवळसर पाणी पुरवठा नळाद्वारे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत वेळोवेळी मनपा प्रशासनाला विनंती, सूचना करुनही नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होतच आहे. नागरिकांनी साठवणुक केलेल्या पाण्यात किडे आढळल्याच्याही तक्रारीही नागरिकांकडून नोंदवल्या जात आहेत. या अस्वच्छ पाण्यामुळे पोटाचे आजार, त्वचाविकार आणि इतर आजारांना बळी पडलेल्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, विशेषत: लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उघडकीस आल्या आहेत. या विरोधात शुक्रवारी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह प्रभारी आयुक्त देवीदास जाधव यांची भेट घेऊन या सर्व नागरी समस्या बद्दल आयुक्तांशी चर्चा केली व निवेदन सादर केले.
दरम्यान नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणा-या या गंभीर समस्येवर त्वरित उपाय हवेत, असे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी यावेळी मनपा प्रशासनाला सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव गोरोबा लोखंडे, कैलास कांबळे, अॅड. फारुक शेख, दगडूआप्पा मिटकरी, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, इम्रान सय्यद, आयुब मणियार, नागसेन कामेगावकर, विजयकुमार साबदे, आसिफ बागवान, चंद्रकांत धायगुडे, शरद देशमुख, अॅड. गणेश कांबळे, पवनकुमार गायकवाड, नितीन कांबळे, कुणाल वागज, राजु गवळी, दयानंद कांबळे, हुसेन शेख, करण गायकवाड, असलम शेख, मैनुद्दीन शेख, अक्षय मुरळे, आकाश मगर, सोमेन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.