24.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeलातूरदेवणी गाय ‘भाग्यलक्ष्मी’चा परळीमध्ये जलवा

देवणी गाय ‘भाग्यलक्ष्मी’चा परळीमध्ये जलवा

लातूर : प्रतिनिधी
परळी येथे आयोजित अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन महापशुधन एक्स्पो २०२६ मध्ये हासेगाववाडी (ता. औसा) येथील शेतकरी सोनेराव श्रीपती लवटे यांच्या ‘भाग्यलक्ष्मी’ या देवणी गायीने देशी गोवंशाच्या दुग्ध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सोनेराव लवटे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. प्रविण देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, तसेच माफसूचे विस्तार शिक्षण संचालक  डॉ. सचिन बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कृष्ट बांधा, आकर्षक ठेवण व उच्च प्रजननक्षमतेसाठी ओळखली जाणारी सहा वर्षांची, तिस-या वेतातील ‘भाग्यलक्ष्मी’ने १३.५ लिटर दूध उत्पादन करून परीक्षकांचे व उपस्थितांचे लक्ष वेधले. देशी गोवंशातील विविध नामांकित गायींमध्ये झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत हासेगाववाडी गावासह औसा तालुक्याचा नावलौकिक वाढविला. ‘भाग्यलक्ष्मी’ची यशस्वी परंपरा यापूर्वीही कायम राहिली आहे. २०२३ साली शिर्डी येथे आयोजित अखिल भारतीय स्तरावरील प्रदर्शनासह कोल्हापूर, माळेगाव यात्रा (नांदेड), सिद्धेश्वर यात्रा (लातूर), हावगीस्वामी यात्रा (उदगीर) आणि जळकोट येथील पशुपक्षी प्रदर्शनांमध्येही तिने सातत्याने पारितोषिके पटकावली आहेत.
माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डी. बी. हराळे यांनी ‘भाग्यलक्ष्मी’च्या आहार, आरोग्य व आरोग्य व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना सोनेराव लवटे यांनी व्यक्त केली. जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संतोषअप्पा मुक्ता, सरपंच सतीश लवटे, शेषेराव मानवर तसेच ग्रामस्थांनी ‘भाग्यलक्ष्मी’च्या या भव्य यशाबद्दल अभिनंदन करून अभिमान व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR