25.7 C
Latur
Tuesday, August 12, 2025
Homeमहाराष्ट्रदोन्ही राजेंना आव्हान देणारी तिसरी आघाडी?; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

दोन्ही राजेंना आव्हान देणारी तिसरी आघाडी?; नाराजांच्या बंडखोरीची शक्यता

सातारा : प्रतिनिधी
मनोमिलन होवो की न होवो सातारा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांमध्ये दोन्ही राजेंचे समर्थक उमेदवार असतील. मात्र, दोन्ही राजांना आव्हान देणारी तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुप्त पातळीवर सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी मोट बांधण्याचे प्रयत्न येत्या काही दिवसांत गतिमान होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मनोमिलनाच्या शिलेदारांना आव्हान देणे तिस-या आघाडीसाठी अग्निपरीक्षा ठरणार असली तरी भाजपच्या निष्ठावंतांची नाराजी आणि नव्या दमाचे मेहरबान यांना तिस-या आघाडीला चुचकारावे लागेल.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या संस्थांच्या निवडणुकीसाठी शासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. राजकीय हालचालीसुद्धा गतिमान होत आहेत. ‘माझे मन मोठे आहे. मात्र, शिवेंद्रसिंहराजे बिझी आहेत’, असे म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाच्या चर्चांना हवा देण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे हे सुद्धा राजकारणात मुरलेले असल्याने त्यांनी याबाबतचा निर्णय थेट पक्षश्रेष्ठींकडे सोपवून आपली सुटका करून घेतली आहे. मात्र, तरीही बंडखोर आणि तिसरी आघाडी यांची शक्यता लक्षात घेता ‘मी आणि तू’ याच्या पलीकडे साता-याच्या राजकारणाचा परिघ नको म्हणून दोन्ही राजे एकत्र येऊ शकतात.

२००७ च्या ऐतिहासिक मनोमिलनात तिस-या आघाडीने आव्हान दिल्याने दोन्ही राजे अदालतवाड्याच्या साक्षीने एकत्र आले होते. पुढील १० वर्षे सातारा नगरपालिकेने मनोमिलन अनुभवले मात्र २०१९ च्या निवडणुकीत राजघराण्यातील सत्ता विरुद्ध सर्वसामान्य स्त्री असा संघर्ष उभा करून उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने एकतर्फी लढत जिंकली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव ही शिवेंद्रराजे यांच्यासाठी ठसठसणारी जखम ठरली होती. मात्र, दरम्यानच्या काळात साता-याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

सहा वर्षांपासून दोन्ही राजे एकत्र
दोन्ही राजे गेल्या ६ वर्षांत टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टीत दाखल झाले. एकमेकांवर तोंडसुख घेणारे दोन्ही राजे आधी लोकसभा, नंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आले. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना राजकीय झप्पी देत सगळे मतभेद मिटवून टाकले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्ष आज्ञा पाळून उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मताधिक्य तर दिलेच शिवाय बंधूप्रेमाची प्रचितीसुद्धा दिली.

मनोमिलन जर झाले तर बंडखोरी होणार

सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन्ही राजांच्या नोंदणीकृत आघाड्या आहेत. दोन्ही आघाड्यांकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण अशा दोन्ही लढतींचा प्रस्ताव दिला जाईल. पण राजकीय महत्त्वाकांक्षा कोणाच्याच लपून राहिलेल्या नाहीत. मनोमिलन जर झाले तर बंडखोरी ही होणार हे उघड आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR