सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-दोडामार्ग रस्त्यावर सोमवारी ३० जून रोजी सकाळी दोन एस बसची समोरासमोर धडक झाली. पानवळ येथे झालेल्या या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी जखमी झाले. ही घटना सकाळी ६:४५ वाजता घडली. भरधाव वेगात असलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा-फुकेरी बस फुकेरीहून बांद्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी समोरून उस्मानाबाद-पणजी बस वेगाने येत होती. पानवळ येथे दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण, वेगामुळे फुकेरी बसला १०० फूट फरफटत नेले.
फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल १०० फूट फुकेरी बसला फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत. अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.