लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामात सुरूवातीला हवा-हवा असणारा पाऊस शेवटच्या टप्यात नकोसा झाला होता. खरीप हंगामात अनेक मंडळात झालेल्या अटीवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनचे ढिगारे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. खरीप हंगामातील कांही अंशी पिके हाती लागली असली तरी बहूतांश पिकांचे अतिवृष्टीच्या पाससाने अधिक नुकसानच केले. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्याकडून शेतक-यांच्या अधिक अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हयात आज पर्यंत १ लाख ९२ हजार ३०४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.
जिल्हयात मे, जून पासून पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरण्या व पिक वाढीसाठी पोषक असाच पाऊस झाला होता. मात्र सप्टेंबर अखेर अतिवृष्टी होऊन खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच पावसाचा शेतक-यांना सामना करावा लागला. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी पावसाचा आडसर ठरला. शेतीची मशागत होऊन पेरण्या सुरू झाल्या आहेत.
जिल्हयात यावर्षी ३ लाख ८१८ हजार ६८८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा होण्याची शक्यता असून जिल्हयात आजपर्यंत १ लाख ९२ हजार ३०४ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. यात १७ हजार ३६३ हेक्टरवर ज्वारी, ५ हजार ७८१ हेक्टरवर गहू, ७५१ हेक्टरवर मका, १ लाख ६१ हजार ५८९ हेक्टरवर हरभरा, ६ हजार ६७ हेक्टरवर करडई, ४८ हेक्टरवर जवस, ३० हेक्टरवरी सुर्यफल आदी पिकांचा पेरा झाला आहे.

