पुणे : प्रतिनिधी
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली असून जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल ही पक्षाची भूमिका आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले असताना ते बोलत होते. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, आणि पक्षहित जपले जाईल. त्याबाबत पक्ष विचार करीत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत सूर निघाला होता. मात्र याबाबत त्या-त्या जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा विचार करून पक्षाचे नेते योग्य तो निर्णय घेतील असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, निवडणुकीत जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य करावा लागेल. यामध्ये ईव्हीएम यंत्रणेला दोष देता येणार नाही तर पराभवाचे चिंतन करायला हवे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदार वाढीबाबत विरोधक मुद्दा उपस्थित करीत आहेत याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, पराभवाच्या धक्क्यातून नेतेमंडळी अजून सावरली नाही. त्यामुळे टीका करण्यात येत आहे.
आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक सक्षम करणे आणि पक्षाचा विस्तार यावर जास्त लक्ष दिले जाणार आहे. असे नमूद करून ते म्हणाले, यासाठी राज्याचा दौरा करण्यात येणार आहे. पक्षात येण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्या-त्या जिल्ह्यात त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.