पार्ल : वृत्तसंस्था
भारताने संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली. मात्र, अर्शदीप सिंगने २ विकेट मिळवत सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे तिसरा वनडे सामना भारताला जिंकता आला. भारताने या सामन्यात तर विजय मिळवलाच. पण २-१ अशी मालिकाही खिशात घातली. भारताला या सामन्यात ७८ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला. संजू सॅमसनच्या शतकाने भारताच्या संघाला तारल्याचे पाहायला मिळाले.
भारताने या सामन्यात रजत पाटीदारला सलामीची संधी दिली होती. पण त्याला २२ धावाच करता आल्या. या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करणारा साई सुदर्शन फक्त १० धावांवर बाद झाला. भारतासाठी हा एक मोठा धक्का होता. कर्णधार लोकेश राहुलही यावेळी २१ धावांवर बाद झाला होता. पण यावेळी भारतीय संघाला सावरले ते संजू सॅमसनने. दुस-या सामन्यात अपयशी ठरल्यावर संजूवर जोरदार टीका करण्यात आली होती. पण गेल्या सामन्यातील अपयश संजूच्या शतकाच्या झळाळीने झाकोळले.
भारतीय संघाला यावेळी एका चांगल्या खेळीची गरज होती. भारताच्या या अडचणीच्या काळात संजू संघासाठी धावून आला. त्याला तिलक वर्माची चांगली साथ मिळाली. संजू आणि तिलक वर्मा यांनी तब्बल ११६ धावांची भागीदारी रचली आणि भारताचा डाव सावरला. यावेळी तिलक वर्मा ५२ धावांवर बाद झाला आणि त्यामुळे ही जोडी फुटली. पण तिलक बाद झाला तरी संजू थांबला नाही. त्याने धडाकेबाज शतक ठोकत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. ६ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर १०८ धावांची धमाकेदार खेळी साकारली. अखेरच्या षटकात रिंकू सिंगने फटकेबाजी करत ३८ धावा केल्या, त्यामुळे भारताला २९६ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताच्या २९७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डे झोर्झीने ८१ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सहज हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण अर्शदीप सिंगने त्याला बाद केले आणि त्यामुळे भारताला विजयाची आशा निर्माण झाली होती.