बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचे हादरवून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर ४ मार्चला मुंडेंनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कृषी विभागातील कथित घोटाळ्याच्या आरोपांनंतर सुरेश धस थेट ईडीला पत्र लिहून तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेश धस यांनी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागातील तब्बल २०० कोटी रुपये परस्पर उचलले होते, असा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पुराव्यानिशी कृषी घोटाळाप्रकरणी मुंडेंवर आरोप केले होते. त्यामुळे कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दमानियांनी केले धनंजय मुंडेंवर आरोप
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना जवळपास २४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.