बीड : प्रतिनिधी
भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीमधील आपली जमीन लुबाडल्याचा आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केला आहे. भाजप नेत्याच्या मध्यस्थीने ही फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सारंगी महाजन यांनी केलेल्या आरोपानुसार, घरगड्याच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी दावा दाखल केला आहे. त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय परळी शहर पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातल्या परळीमधल्या जिरेवाडी येथील जमिनीचे हे प्रकरण आहे. सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये धनंजय आणि पंकजा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संगनमताने परळीच्या जिरेवाडी येथील जमीन बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असून २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी असल्याची माहिती सारंगी महाजन यांनी दिली. याशिवाय माझा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. परळी तालुक्यातील जिरेवाडीतील ६३.५० आर. जमीन कटकारस्थान रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने लुबाडल्याचा आरोप आहे.
जिरेवाडी येथील ही जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड मार्गालगत आहे. यातील २७ आर. जागा ही शासनाने रस्ते विकासकामासाठी संपादित केली आहे. उर्वरित ३६.५० आर. जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंडे याच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गित्ते यांच्या नावे करून आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोपही सारंगी महाजन यांनी केला.