मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या मते, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि गिरणी कामगारांच्या पुनर्वसनात मराठी माणसाला दुर्लक्ष केले जात आहे आणि विशिष्ट उद्योजकांना फायदा होत आहे. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मूळ मराठी रहिवाशांना विस्थापित करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. धारावी प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वांत मोठा घोटाळा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये सामान्य मराठी माणसाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असून विशिष्ट उद्योजकांना फायदा पोहोचवला जात आहे, असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी विशेषत: धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर तीव्र चिंता व्यक्त केली.
‘धारावी हा आता मुंबई, महाराष्ट्रातला नव्हे, तर देशातला मोठा जमीन घोटाळा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा ‘लॅण्डस्पॅम’ या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतोय. याआधी महाराष्ट्रात पुनर्वसन प्रकल्प झाले आहेत. हा प्रकल्प नवीन नाही. धारावी तुम्ही अदानीला दिल्यावर त्याच्यावर सर्वच स्तरांवरून जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे आणि त्यांच्यावर मुंबईतील भूखंडाची मेहेरबानी दिली जात आहे. ते यापूर्वी कधी झालं नव्हतं. ते का होतंय?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मुंबईतील मूळ मराठी माणसाला विस्थापित करण्याचा हा एक मोठा कट आहे. जंगलतोड करून किंवा इतर मार्गांनी जमिनी बड्या उद्योजकांना दिल्या जात आहेत. त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड आला तर तुम्ही तुरुंगात जाल. कारण जनसुरक्षा धोक्यात आणली आहे. मुंबईकरांनी एकवटून विरोध केला पाहिजे. तुमच्या घरातील वीज, गाड्या तोच देणार म्हणजे तुम्ही गुलाम होणार. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. धारावीत गिरणी कामगारांना घरे का देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जागा ही धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली आहे. त्याची गरज नाही. ती गिरणी कामगारांना का देत नाही? गिरण्याच्या जमिनीचा वापर फक्त गिरण्यासाठीच होता. पण चेंज ऑफ यूजर्स केलं. पण गिरणी कामगारांना घर दिलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हा देश अदानी चालवताहेत की अडाणी..
धारावीसाठी भूखंड घशात फुकट घातले. आमच्या गिरणी कामगारांना द्याना फुकट. गिरणी कामगार तुमचे कुणीच लागत नाहीत. त्यांच्यासाठी काहीच नाही. ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना काही देत नाही. देवनारचं डंपिंग ग्राऊंडही अदानीला दिले. डंपिंगचा कचरा साफ करणारी कंपनीही अदानीचीच आहे. हा देश अदानी चालवताहेत की अडाणी चालवताहेत.. शिवसेना मुंबईसाठी कुठेही तडजोड करत नव्हती. ती तोडायचा, चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. धारावीचा पुनर्विकास मीही करत होतो.
आधी गिरणी कामगार फसला
धारावी रिकामी केली जाते. धारावीत टॉवर येणार. तिकडे धारावीत कोणी मराठी माणूस घर विकत घेऊ शकत नाही. मग कोण येणार. बुलेट ट्रेन ज्यांच्यासाठी आहे तेच येणार. वांद्रे रिक्लेमेशन माहीम कॉजवेजवळची जमीन का धारावीकरांना दिली जात नाही.. कांजूरची जागा आपण मेट्रोसाठी मागत होतो. ती दिली नाही. आपले सरकार पाडले. आरेचं जंगल पाडलं. आरेत मेट्रोची कारशेड होणार आणि कांजूरची जागा अदानीला देणार, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
आधी गिरणी कामगार फसला आणि आता या मुंबईतला उरलासुरला मराठी माणूस फसवला जातोय. आणि हे सगळं गौतम अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी कायदे बदलले जाताहेत, नियम बदलले जाताहेत, सर्वकाही बदललं जात आहे. हे सरकार अदानीला धारावीसाठी कुर्ल्याच्या मदर डेअरीची जमीन फुकटात देतंय. देवनारचं डंपिंग ग्राऊंड दिलं. कांजूरमार्गची जमीन आहे. तिचंही तेच होतंय. मुंबईची मिठागरं देत आहेत. म्हणजे मुंबई गेलीच ना, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.