धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पक्षांतर केल्यानंतर शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी (दि. २८) पहिल्यांदाच धाराशिव जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत.
शहरातील सिद्धाई मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता संवाद दौ-यात ठाकरे हे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत पक्षाची विस्कळित झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी, जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बंडखोर खासदारावर ते काय तोफ डागणार याकडेही विशेष लक्ष लागले आहे.
खासदार राजेनिंबाळकर यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे हे येत आहेत त्यामुळे ते ओमराजे यांच्यावर तोफ डागणार हे निश्चित आहे. ते नेमकी काय टिका करणार याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या संवाद कार्यक्रमास जिल्ह्यातील शिवसेनिकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, शंकराव बोरकर, मकरंद राजेनिंबाळकर, रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे.
















