16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवधाराशिवमध्ये होणार फेर मतमोजणी

धाराशिवमध्ये होणार फेर मतमोजणी

शरद पवार गटाने घेतला आक्षेप मोजणीसाठी भरली रक्कम

धाराशिव : प्रतिनिधी
७६ लाख मते आली कुठून हा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनेक गावांतील मतदानात तफावत असल्याचा आरोप होत असतानाच शरद पवार गटाने परंडा विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमविरोधात थेट पाऊल टाकले आहे त्यामुळे या ठिकाणी मतांची फेरमोजणी होणार आहे.

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यांचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला. त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे.

त्यासाठी ८.५ लाख रुपये त्यांनी निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत. १८ मशिनची पुन्हा फेरमोजणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मोटे यांनी मागणी केली आहे.

‘ईव्हीएम’ विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. ७६ लाख मते आली कुठून या प्रश्नासह काँग्रेस मैदानात उतरली आहे. तिकडे मनसेने सुद्धा या मुद्यावरून नाराजीचा सूर आळवला आहे. राज्यातील काही गावांत, मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा, मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात अर्ज करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा मार्ग चाचपण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे. ईव्हीएम या मतमोजणीच्या परीक्षेत पास होते की नापास हे लवकरच समोर येणार आहे.

अटीतटीच्या सामन्यात झाला पराभव
परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला होता. या मतदारसंघात तानाजी सावंत यांनी १५०९ मतांनी निसटता विजय मिळवला.

तानाजी सावंत यांना १ लाख तीन हजार २५४ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना १ लाख १ हजार ७४५ एवढे मतदान झाले. त्यानंतर मोटे यांनी फेर मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. फेर मतमोजणी झाल्यानंतर काय चित्र राहणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

राज्यात महायुतीची लाट आली आहे. भरभरून मतदान झाले आहे. भाजपाला तर खो-याने मते मिळाली आहेत. त्यामागे मोठे धोरण आहे. पण विरोधकांना ते पचनी पडत नसल्याचे दिसते. काही मतदान केंद्रांवर मतदार कमी आणि मतदान अधिक असा प्रकार समोर आल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर काही ठिकाणी ऑडिओ क्लिपमधून ईव्हीएम हॅकिंग करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR