Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यात पालिका निवडणूकीत शिवसेना, भाजपचा दणदणीत विजय

धाराशिव जिल्ह्यात पालिका निवडणूकीत शिवसेना, भाजपचा दणदणीत विजय

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील नगर पालिका निवडणूकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. जिल्ह्यात ८ पेकी चार जागावर शिवसेना तर चार जागेवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. याउलट महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हाती नगराध्यक्ष पदाची एकही जागा मिळवता आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या हाती भोपळाच मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाच्या एकूण आठ जागा होत्या. त्यापेकी धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग व मुरुम या चार पालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर परंडा, भूम, कळंब, उमरगा नगरपालिकेमध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आठ पालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीची रविवारी (दि.२१) मतमोजणी प्रक्रीया पार पडली. सकाळी १० वाजल्यापासून मजमोजणीला सुरुवात झाली. धाराशिव वगळता इतर सर्वत्र गतीने मतमोजणी झाली. साधारणत: १ वाजेपर्यंत निकाल हाती आले. धाराशिवमध्ये मात्र प्रशासनाच्या डिसाळ नियोजनामुळे मतमोजणीस विलंब लागला. धाराशिव नगरपालिकेसाठी एकूण सहा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये नेहा राहुल काकडे यांना २१ हजार १५२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांना द्वितीय क्रमांकाची १८ हजार ५४१ मते मिळाली तर तिस-यास्थानी ठाकरे सेना-कॉग्रेसमहाविकास आघाडीचे उमेदवार संगिता सोमनाथ गुरव यांना १४ हजार २९६ मते मिळाली. यामध्ये नेहा राहुल काकडे यांचा जवळपास २ हजार ६११ मतांनी दणदणीत विजय झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या तुळजापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पिटु उर्फ विनोद गंगणे यांना १२ हजार २७२ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे अमर अशोकराव मगर यांना १० हजार ५८६ मते मिळाली. यामध्ये विनोद गंगणे यांचा १६८६ मतांनी दणदणीत विजयी झाले आहेत. मुरुम नगरपालिकेमध्ये माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील हे विजयी झाले आहेत. बापूराव पाटील यांनी प्रतिस्पर्धी अजित चौधरी यांचा ४०१९ मताने पराभव केला.

शिवसेना शिंदे गटाचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण गायकवाड यांनी ११ हजार ६६० मते घेत दणदणीत यश मिळवत भारतीय जनता पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालूक्य (५३७६) यांचा ६२८४ मतांनी पराभव केला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रजाक अत्तार यांना ४०१३ मते मिळाली आहेत. नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटाने बाजी मारत १२ जागा मिळवल्या आहेत तर त्यांच्यासोबत असलेल्या आघाडीचे काँग्रेस पक्षाने ६ जागा मिळवल्याने त्यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. भारतीय जनता पक्षाला ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना २ जागा मिळवण्यात यश मिळाले आहे.

परंडा नगरपालिकेत जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील व शिवसेना शिंदे सेनेचे जाकीर सौदागर यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये जाकीर सौदागर यांचा केवळ १८९ मतांनी विजय झाला. सौदागर यांना ६ हजार ७९५ मते मिळाली तर विश्वजीत पाटील यांना ६ हजार ६०६ मते मिळाली आहे. नगरसेवक पदासाठी मात्र याठिकाणी जनशक्ती नगरविकास आघाडीचे १२ सदस्य विजयी झाले आहेत. तर सौदागर यांच्या गटाचे केवळ ८ सदस्य विजयी झाले आहेत. भूम नगर पालिकेत आलमप्रभू नगर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संयोगिता संजय गाढवे यांचा १९८ मतांनी विजय झाला. त्यांना ७ हजार ८६ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सत्वशिला धनाजी थोरात यांना ६ हजार ८८२ मते मिळाली आहे. भूम पालिकेत नगरसेवक पदामध्ये जनशक्ती नगर विकास आघाडीचे १४ सदस्य विजयी झाले आहेत.

तर आलमप्रभू नगर विकास आघाडीचे केवळ ६ सदस्य विजयी झाले आहेत. नळदुर्ग नगर पालिकेत नगराध्यक्ष पदाचे बसवराज धरणे (भाजपा) ४३३१ मते मिळाली. धरणे हे ४२० एवढ्या मताने विजयी झाले. तर शहबाज काझी (एआयएमआयएम) ३९११ तर अशोक जगदाळे (काँग्रेस) यांना २९६८ मते मिळाली. याठिकाणी काँग्रेसचे ९ नगरसेवक विजयी झाले तर भाजपाचे १० नगरसेवक व शिंदे सेनेचा १ नगरसेवक विजयी झाला आहे. कळंब नगरपालीकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे यांना ७ हजार ६८९, रश्मी संजय मुंदडा यांना ५ हजार ४३५ व मिनाक्षी श्रीधर भवर यांना १७६० मते मिळाली आहेत. कापसे यांनी २२५४ मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली आहे. भाजपने सहा जागेवर विजय मिळवला आहे. शिवसेना उबाठा ९ तर कॉग्रेस पक्षाला १ जागा मिळाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR