17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरधिरज यांच्यासाठी रितेश यांची हाक  युवाशक्तीचा प्रचंड प्रतिसाद 

धिरज यांच्यासाठी रितेश यांची हाक  युवाशक्तीचा प्रचंड प्रतिसाद 

महिला मेळाव्यात विजय निश्चित अन् युवकांच्या मेळाव्यात लिडकडे वाटचाल: सिनेअभिनेते रितेश देशमुख यांचे प्रतिपादन 
लातूर : प्रतिनिधी 
युवकांच्या प्रचंड मोठ्या गर्दीत सर्वांचे लाडके सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख यांचे लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्यासमवेत आगमन झाले. त्यावेळी युवकांच्या उत्साहाला उधान आले. यावेळीरितेश देशमुख यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या विजयासाठी हाक देताच युवाशक्तीकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून कालचा महिलांचा मेळावा धिरज देशमुख यांचा विजय निश्चित करणारा होता तर आजचा युवक मेळावा धिरज देशमुख यांच्या मतांच्या लिडकडे वाटचाल करणार असल्याचे रितेश देशमुख म्हणाले.
लातूर ग्रामीणचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी येथे युवकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषेराव हाके, युवक काँग्रेस प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कैलास पाटील, बादल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात युवकांशी संवाद साधताना सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी विधानानसभेची निवडणूक ही लातूर शहर आणि लातूर ग्रामीणच्या स्वाभीमानाची आहे. धिरज देशमुख यांच्या कामाची, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षाची आहे. युवक, महिला भगिनी आणि ज्येष्ठांचे मिळणारे आशीर्वाद ही धिरज देशमुख यांच्या निष्ठेची पावती आहे. गेल्यावेळी एक लाखांपेक्षा अधिकची लिड मतदारांनी धिरज देशमुख यांना दिली होती. आता त्यापेक्षा अधिक लिड द्या, असे आवाहन केले.
सुशिक्षितांसह सर्वांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सरकारची असते. महिला भगिनींना सुरक्षा देण्याची जबाबदारीही सरकारचीच असते. परंतु महायुतीच्या सरकारने काय केले, ना नोकरी दिली, ना महिला भगिनींना सुरक्षा, असे नमूद करून रितेश देशमुख म्हणाले की, भाजपा महायुतीला धडा शिकविण्यासाठी युवकांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करुन घ्यावे. प्रारंभी लातूर ग्रामीणचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लातूर शहर, ग्रामीण मतदारसंघात 
विजयाचा नवा पॅटर्न निर्माण करा
या प्रसंगी विकासरत्न विलासराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख हे दोघेही विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांच्या विजयाचा नवा पॅटर्न निर्माण करा. तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सर्वांचा पंजा भारी, असे रितेश देशमुख यांनी म्हणताच युवकांनी जल्लोषात त्यांना दाद दिली.
धर्म नव्हे कर्माला 
धर्म न मानणारे धोक्यात 
भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते, कर्म हाच धर्म. जो काम करतो, त्याच्यात आपण धर्म केल्याची भावना येते. अमूक धर्म धोक्यात, तमूक धर्म धोक्यात, असे ओरडून ओरडून सांगण्यात येत आहे. परंतु कोणताच धर्म धोक्यात नसतो. धोक्यात असतो तो, जो जनसामान्यांची कामे करीत नाही. तोच स्वत:ला वाचविण्यासाठी धर्म धोक्यात आहे, असे सांगत सुटतो, ही बाब लक्षात घ्या आणि कार्यतत्पर असलेले धिरज देशमुख यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा, असे आवाहन रितेश देशमुख यांनी केले.
थेट विधानभवनावर ‘मविआ’चे 
वादळ धडकणार : धिरज देशमुख 
अत्यंत जोशपूर्ण भाषण करताना आमदार धिरज देशमुख म्हणाले, नुकत्याचा संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडीचे वारे होते. परंतु विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या या वा-याचे आता वादळात रुपांतर झाले असून महाविकास आघाडीचे हे वादळ थेट विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत कार्यक्षमपणे काम करीत होते. सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीने शेतक-यांच्या कर्जमाफीचा पहिला निर्णय घेतला होता. कोरोना संकटाच्या काळातही उत्तम प्रकारे काम सुरु होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून अमित देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. परंतु गद्दारांनी षडयंत्र रचून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले आणि धोकेबाजांनी सत्तास्थापन केली. महायुतीच्या सरकारने सर्वाचेच वाटोळे केले, असे नमूद करुन आमदार धिरज देशमुख म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने विविध कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्रात उद्योग उभारणीचे काम सुरु केले होते. त्यातून असंख्य युवकांच्या हाताला काम मिळणार होते. परंतु महायुती सरकारने विविध कंपन्यांचे उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील युवकांचे हातचे काम हिसकावून घेतले. शेतक-यांना हमीभाव, महिलांना सुरक्षा आणि युवकांच्या हाताला काम मागितले होते. परंतु महायुतीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. सोयाबीनला भाव मिळावा म्हणून दिंडी काढणारे आज गप्प का आहेत, शेतकरी आंदोलन करताना दिल्लीच्या सीमेवर ७०० शेतक-यांनी बलिदान दिले तरीही याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. ज्यांनी शेतक-यांचा नाद केला, शेतक-यांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यामळे फसव्या घोषणांना बळी न पडता महाविकास आघाडीला भरभरुन आशीर्वाद द्या. पंजाचे बटन दाबताच महायुतीचे सरकार पडणार आहे आणि केंद्रातील सरकार हादरणार आहे, असेही आमदार धिरज देशमुख म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR