धुळे : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोंडाईचा येथे राहुल गांधींची भव्य रॅली आयोजित करण्यात आली. यानंतर ते धुळे शहरात दाखल झाले. धुळे शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच महिलांसाठी त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, मागील वर्षी कन्याकुमारीपासून आम्ही ४ हजार किलोमीटरपर्यंत चालत भारत जोडो यात्रा काढली. लोकांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही कन्याकुमारीला गेलात. पण, मणिपूर, ओरिसा, बिहार, झारखंडमध्ये तुम्ही गेला नाहीत. म्हणून आम्ही ठरवले होते की, दुसरी भारत जोडो यात्रा काढायची. याला भारत जोडो न्याय यात्रा नाव देण्यात आले.
देशात २२ असे लोक आहेत ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच ७० कोटी लोकांकडे आहे. २४ वर्षांसाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागते तितकीच कर्जमाफी मोदी सरकारने १६ लाख करोड रुपये २२ उद्योगपतींना दिले आहेत, असे आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केले आहेत. देशात ५० टक्के मागास लोक आहेत.
पण याचा अंदाज कुणालाच नाही. यात १५ टक्के दलित आहेत. १५ टक्के अल्पसंख्याक आहेत. तर ८ टक्के आदिवासी आहेत. केवळ ९० लोक सरकार चालवतात. ते आयएएस लोक आहेत. कुणाला किती बजेट मिळणार हे ठरवतात. यात दलित केवळ ३जण आहेत. एकही आदिवासी नाही. दलित १५ टक्के आहेत. बजेटमध्ये हिस्सेदारी केवळ १ टक्का आहे. जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत लोकांचा विकास होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
मोदींनी मोठ्या धूमधडाक्यात महिला आरक्षण दिले. फटाके फोडले, नाचले आणि सांगितले गेले की, सर्व्हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार. कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देणार. सरकारी नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देणार. आशा अंगणवाडीमध्ये काम करणा-या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नोकरी करणा-या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार आहे.