रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी रविवारी (दि. १६ )उमेदवारांचा उत्साह वाढताना दिसत असून निवडणूक विभागात दिवसभर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ५ व नगरसेवक पदासाठी ६१ विविध प्रभागांमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने सोमवारी दि १७ रोजी मोठी गर्दी होणार आहे. इच्छुक उमेदवार कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत .
रेणापूर नगरपंचायतीच्या १७ प्रभागासाठी १७ नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे तर नगराध्यक्ष पदाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे . यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सोमवार दि १० पासून प्रारंभ झाला होता .गेल्या पाच दिवसात एकही इच्छुक उमेदवारांचा अर्ज दाखल झाला नाही. शनिवारी सहाव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी १ असे दोनच अर्ज दाखल झाले. रविवारी सुट्टी असताना ही निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या सूचना केल्याने रविवारी नगराध्यक्ष पदासाठी ५ व नगरसेवक पदासाठी ६१ अर्ज दाखल करण्यात आले. इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक विभागात गर्दी झाली होती तर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालय परिसर दिवसभर गजबजून गेला होता .

